Ad will apear here
Next
नाट्यसंजीवनी : भाग आठवा (ऑडिओसह)
संगीत शांतिब्रह्म नाटकातील काही दृश्ये

रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा आठवा भाग...
.......
प्रसंग एकनाथ महाराजांच्या वाड्यातला आहे. 

श्रीपतीशास्त्री नाथांना आमंत्रण द्यायला आले आहेत. मंदिराच्या प्रांगणात बहुजन एकत्र येणार आहेत आणि त्यांची इच्छा आहे, नाथबाबांनी भागवताचं निरूपण करावं. नाथांचा नकार नाही; पण परिस्थिती विपरीत झाली आहे. 

शास्त्रीबुवांच्या शब्दात सांगायचं, तर, शांतिसूक्त घोकणाऱ्यांनी अशांतीची बीजं पेरायला प्रारंभ केला आहे. एकनाथांवर कटू शब्दाची चिखलफेक करून त्यांना आयुष्यातून उठवण्याची भाषा समाज करीत आहे. हरिपंताला कर्मठ आचार्यांकडे विद्याध्ययनासाठी दाखल करून ओली माती नको त्या माणसांच्या हाती सोपवली आहे. अशा वेळी नाथांनी काहीतरी करायला हवं; पण ते केवळ बहुजनांसाठी मानवता धर्माची पाठराखण करीत आहेत, याची तक्रार थेट काशीक्षेत्री शंकरचार्यांकडे केली आहे समाजाने. 

ज्याला नाथमहाराज मानवता धर्म मानतात तो आज इथल्या समाजधुरीणांच्या मते गुन्हा ठरला आहे. 

असं तळमळून बोलणारे शास्त्रीबुवा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात. 

अर्थात नाथमहाराजांच्या कार्याचे महत्त्व त्यांना माहीत आहे. त्यामुळे एकीकडे कर्मठ माणसांवर कठोर प्रहार करीत असताना हळूच एकीकडे कबूल करून टाकतात, की भागवताचे निरूपण त्यांनाही ऐकायचे आहे. 

एकनाथ महाराज त्यांना होकार देतात; पण त्यांना ही कल्पना आहे, की यामुळे ठिणगी पडणार आहे आणि त्याची सुरुवात आपल्याच घरातून होणार आहे. त्याची झळ गिरीजबाईंना लागू नये, म्हणून ते तिची अगोदरच समजूत काढायला प्रारंभ करतात. ते म्हणतात, ‘मोहावर विजय मिळवणं जितकं कठीण, तितकं तुझ्या शब्दातून दूर होणं कठीण. तू बोलू लागलीस की साक्षात भवानी प्रसन्न झाल्याचा साक्षात्कार होतो. हा भवसागर पार करण्यासाठी तू आदिशक्ती म्हणून माझ्या पाठीशी उभी आहेस. तू शुभदा तर आहेसच; पण बोलण्यात इतकं माधुर्य आहे की जणू मायेचा चैतन्य झराच वाहू लागतो आहे असं वाटतं.’ 

शांतिब्रह्म नाटकात इथे गाण्याची जागा आम्हाला सापडली. 

संगीत नाटकात गाण्याची नेमकी जागा सापडणं आणि ते गाणं कथानकाशी एकरूप होणं महत्त्वाचं असतं. त्याबद्दल चर्चा चालू असताना मला एकनाथ महाराजांचं आणि गिरीजबाईंचं सोज्वळ रूप दिसू लागलं. त्यांचा संसार हा सर्वसामान्यांसारखा नव्हताच. नाथांच्या कार्याची जाणीव गिरीजबाईंना होती, हरिपंताचा - स्वतःच्या मुलाचा- त्यांच्याशी असलेला वैचारिक विरोध आणि त्यातून होणारा संघर्ष गिरीजबाईंना माहीत होता. त्यामुळे सगळ्यांना सांभाळून घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांचं सात्विक वागणं नाथांना माहीत होतं. 

मग ते कसे व्यक्त होतील, असा विचार मी करीत होतो आणि मग एक ओळ सुचली, 
‘तू शुभदा बोल मधुरा।’

मी विजयला ती ओळ सांगितली. काही क्षण तो विचारात पडला आणि मग म्हणाला, ‘सर, गाणं पूर्ण करा तुम्ही, आपण कलावती रागात त्याची चाल बांधू.’ 

तेच हे गाणं. 

‘तू शुभदा बोल मधुरा ।।’

संगीत आणि गायन : विजय रानडे
ऑर्गन : वरद सोहनी
तबला : केदार लिंगायत

- डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी.

संपर्क : ९४२३८ ७५८०६

(नाट्यसंजीवनी या मालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://bit.ly/2XwoQN6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZBGCN
Similar Posts
नाट्यसंजीवनी : भाग सातवा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा सातवा भाग...
नाट्यसंजीवनी : भाग दहावा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा दहावा भाग...
नाट्यसंजीवनी : भाग नववा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा नववा भाग...
नाट्यसंजीवनी : भाग पाचवा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा पाचवा भाग...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language